-भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर शिंगावर घेऊ पण भाजपाची पोलखोल करतच राहू
-पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड दबावात, सरकारचे अपयश व जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई (तालुका प्रतिनिधी) : मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी भाजपावर तीव्र टीका करत आपल्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास केल्याचा आरोप केला.
सपकाळ म्हणाले की, भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा राबवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आता हे प्रकरण येथेच थांबवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. इतिहासावर मतभेद असू शकतात, मात्र त्यावर संयत व अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी. जात, धर्म, पंथ यांच्या आधारे ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. शिवजयंती दोन दिवसांवर आली असून सर्वांनी गैरसमज दूर ठेवावेत आणि अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाने अत्यंत हिन पातळीवरचे राजकारण केले असून धमक्या देण्यात आल्या, मात्र अशा धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपाची पोलखोल करतच राहणार, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात केलेल्या कामाचा अहवाल बैठकीत मांडण्यात आला. आगामी वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून राबवले जाणार असून ग्रामीण भागात मंडल स्तरावर, गावपातळीवर तसेच शहरात वार्ड व प्रभाग अध्यक्ष नियुक्त करण्याचे नियोजन आहे. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आदी मूलभूत मुद्द्यांवर आंदोलन करून भाजपा सरकारला जाब विचारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, खजिनदार अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते. बैठकीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार व इतर प्रकरणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड दबावात असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या अपयशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून शेतकरी, बेरोजगारी आणि इतर मूलभूत प्रश्नांवर रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील कोस्टल रोड व लोकल प्रवाशांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य करत लोकलमधून दररोज होणाऱ्या अपघाती मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगत काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान दिले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.