-आज मोठ्या शोकाकुल वातावरणात मेहकर येथे अंतिम संस्कार
मेहकर (अशोक इंगळे) : मेहकर येथील प्रसिद्ध व्यापारी वऱ्हाडे कुटुंबातील सिताबाई सखाराम वऱ्हाडे यांचे आज, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेत मानवतेचा आदर्श घालून दिला.
कै. सखाराम वऱ्हाडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांना चार मुले असून सर्वजण व्यापारी क्षेत्रात कार्यरत आहेत. धार्मिक व सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड होती. साखरखेर्डा येथील इंगळे परिवारातील लेक आणि वऱ्हाडे घराण्याची सुन म्हणून त्यांनी दोन्ही कुटुंबांची सामाजिक परंपरा जपली. त्यांचे सामाजिक कार्य व सौम्य स्वभाव यामुळे त्यांना परिसरात मानाचे स्थान होते.
गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. निधनानंतर कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. काढण्यात आलेले नेत्र इतर गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मेहकर येथील पैनगंगा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव, व्यापारी वर्ग, नातेवाईक व चाहत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांच्या निधनामुळे मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.