– हातणी-वळती परिसरात छत्रपती शिवाजी महाराज थीम प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव; १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश!
मुंबई/चिखली (अंकुश पाटील) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिखली तालुक्यातील हातणी आणि वळती परिसरात प्रस्तावित ‘MICE – छत्रपती शिवाजी महाराज थीम प्रकल्प (शिवसृष्टी)’ उभारणीला आता वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगाने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती व चर्चा
मंत्रालयातील या उच्चस्तरीय बैठकीस चिखलीच्या विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे तसेच पर्यटन व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चिखली तालुक्यात शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश मिळत असून, बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली.
प्रशासनाकडून भरीव निधीची ग्वाही
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसृष्टी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी देखील पर्यटन विभागासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी भूमिका मांडली.
प्रकल्पाचे महत्त्व व संभाव्य लाभ
इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन: प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे पराक्रम आणि सुशासन व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. पर्यटन व रोजगार निर्मिती: या प्रकल्पामुळे चिखली तालुक्याला राज्याच्या पर्यटन नकाशावर एक नवी व हक्काची ओळख निर्माण होईल. तसेच स्थानिक पातळीवर युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसराच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आगामी काळात या कामाला अधिक गती देण्यात येणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.