-पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेसह विकासकामांना गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे आवाहन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. संगीता किशोर म्हस्के यांची निवड झाल्यानंतर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी त्यांचे अभिनंदन करत शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, नगरपरिषदेत विकासाच्या मुद्यावर निर्माण झालेल्या सहकार्याच्या वातावरणामुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सिंदखेडराजा शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे २९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे, ५९ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे तसेच इतर विविध विकासकामांचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सिंदखेडराजा शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगताना, विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही डॉ. खेडेकर यांनी स्पष्ट केले. पुढील काळातही मतदारसंघासाठी अधिकाधिक विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, तसेच जनतेचा विश्वास कायम राखत सिंदखेडराजाच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.