-लोणार तालुक्यातील कार्यकर्त्यांची कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे तांत्रिक प्रशिक्षणासाठी रवाना
लोणार (ता. प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ तसेच ‘शेतकरी कप’ (फार्मर कप) या स्पर्धांच्या माध्यमातून दुष्काळमुक्त व समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण आणि शाश्वत शेतीचे काम राबविले जात आहे. ४५ दिवसांच्या कालावधीत होणारी ही स्पर्धा ग्रामीण भागातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यास प्रोत्साहन देते.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यकर्त्यांना ‘गट निमंत्रक’ किंवा ‘मेंटर’ म्हणून प्रशिक्षित करून ‘शेतकरी कप’मध्ये सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे महिला बचत गटांचा सहभाग वाढून गटशेतीला बळकटी मिळते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातात.
पाणी फाउंडेशनमार्फत लोणार तालुक्यातील उमेद अभियानातील (सीआरपी) ग्रामसखी तसेच कृषी विभागामार्फत प्रगतशील शेतकरी यांना १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय मोफत तांत्रिक प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी (जालना) येथे देण्यात येणार आहे. त्यासाठी पहिली प्रशिक्षण तुकडी आज पंचायत समिती लोणार येथून रवाना झाली. या तुकडीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी लोणार पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी रविभाऊ मापरी, विस्तार अधिकारी श्री. मुंढे, तालुका कृषी अधिकारी श्री. शिरोदे, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक संदीप तिडके, सौ. सुनंदा करडेल, प्रभाग समन्वयक योगेश रत्नपारखी, कपिल इंगळे तसेच अक्षय उंद्रे उपस्थित होते.