–महाशिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेक, कीर्तन व सामूहिक महाआरतीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
आळंदी (अर्जुन मेदनकर) : सृष्टीच्या आदिम तत्त्वांचे, ध्यानयोगाच्या अखंड परंपरेचे आणि संहारातून नवसृजन घडविणाऱ्या चेतनेचे प्रतीक आदियोग शिव यांच्या स्मरणाने तळेगाव येथील श्री विश्वनाथ महाकाळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा पावन सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भा.स.त.ग्रा. रुग्णालय तळेगाव येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची रात्र आध्यात्मिक साधनेच्या वातावरणात रंगली. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अस्थिरतेतून शांततेकडे नेणारी ही रात्र भक्तांसाठी विशेष ठरली.मंदिरात रुद्राभिषेक, जल व दुग्धाभिषेक, बेलपत्र व पुष्प अर्पण करून शिवपूजन करण्यात आले. यज्ञ, हवन, सामूहिक महाआरती तसेच भजन-कीर्तन कार्यक्रमांनी परिसर शिवमय झाला. शिवमहिम्न स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र आणि शिवलीलामृत पठणाने भक्तीचा स्वर अधिकच दाटला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी श्रद्धाभावाने नतमस्तक होत आध्यात्मिक उर्जेचा अनुभव घेतला.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी महाशिवरात्रीचे तत्त्वज्ञान स्पष्ट करत सांगितले की, “महाशिवरात्री ही केवळ बाह्य उपासनेची नव्हे, तर आत्मशुद्धी आणि आत्मजागृतीची संधी आहे. अंतर्मनातील अज्ञान, अहंकार व नकारात्मकता दूर करून आत्मप्रकाशाकडे वाटचाल करणे हीच खरी शिवभक्ती आहे. शिव म्हणजे शून्य आणि पूर्णत्व यांचा संगम असून सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिकालात्मक प्रक्रियेचे केंद्र आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात काकडा आरतीने झाली. त्यानंतर रुद्राभिषेक, शालिकराम महाराज खंदारे यांचे हरी कीर्तन, शिवलीलामृत पारायण, हरिपाठ आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब मोरे यांच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, विश्वस्त स्वाती चाटे, उषा विश्वनाथ कराड, कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, गिरीष दाते, योगेश पारखी यांच्यासह तळेगावातील ग्रामस्थ, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.