-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजन अभिवादन सभा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगरपरिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे गुरुवारी (दि. १२) भजन, सर्वधर्म प्रार्थना आणि अभिवादन सभा परंपरेने संपन्न झाली.
यावेळी धनंजय पवार आणि मोहिनी पवार यांनी सुश्राव्य आवाजात सर्वधर्म प्रार्थना व भजन सेवा सादर केली. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पदाधिकारी प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते कालिदास तापकीर, डी. के. कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादन सभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, आचार आणि आदर्श डोळ्यांसमोर ठेवत अहिंसा संवर्धन व सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. रक्षा विसर्जन स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे भारतातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले होते. त्यानुसार एका कलशातील अस्थींचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीत १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्या स्मृतीप्रित्यर्थ येथे रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. गेली ७८ वर्षे ही परंपरा अखंड सुरू आहे.