-२५ हजारांचा फिक्स डिपॉझिट बॉण्ड मुलीच्या नावे
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शिंदी येथील स्व. अनिल सुभाष येरमुले यांनी वर्षभरापूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दि. १३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच अशोक आत्माराम खरात यांनी स्वतः ११ हजार रुपये तसेच गावकऱ्यांच्या वतीने जमा करण्यात आलेले १४ हजार रुपये असा एकूण २५ हजार रुपयांचा फिक्स डिपॉझिट बॉण्ड स्टेट बँक साखरखेर्डा शाखेचा त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला.
स्व. अनिल येरमुले हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी व दोन मुले असून संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर येऊन पडली आहे. अशा बिकट परिस्थितीत या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याच्या भावनेतून सरपंच अशोक खरात यांनी स्वतः ११ हजार रुपयांची मदत दिली. गावातील नागरिकांनीही ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ या भावनेतून मदत जमा करून ती सरपंचांकडे सुपूर्द केली.
स्व. अनिल येरमुले यांची पत्नी रंजना अनिल येरमुले यांच्याकडे त्यांच्या मुलगी कु. स्वरा अनिल येरमुले हिच्या नावाने २५ हजार रुपयांचा बॉण्ड सुपूर्द करण्यात आला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ही मदत दिलासा देणारी ठरली आहे. यावेळी शिवसेना नेते गंभीरराव खरात, सरपंच अशोक आत्माराम खरात, तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर खरात, ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे, गणेश खरात, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खोसे, शेख अन्सार शेख शफी तांबोळी, वडील सुभाष येरमुले, जनार्दन मार्के आदी उपस्थित होते.