-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन अल्हाट पंचतत्वात विलीन
-मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ हरपला; देऊळगाव साखरशा शोकसागरात
-देऊळगाव साखरशा शोकसागरात! परिसरात हळहळ, शनिवारी रक्षा विसर्जन!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील धडाडीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन सुर्यभान अल्हाट (वय ५९) यांचे आज दि. १२ रोजी सकाळी ४ वाजेदरम्यान नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे निधन झाले. या निमित्ताने झंझावात कायमचा विसावला आहे. त्यांच्यावर देऊळगाव साखरशा येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने देऊळगाव साखरशा शोकसागरात बुडाले असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांचे रक्षा विसर्जन शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गजानन सुर्यभान अल्हाट यांना मंगळवारी दि. १० फेब्रुवारी रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथम खामगाव, अकोला व नंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गजानन अल्हाट हे रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित होते. सर्वांच्या सुखदुःखात ते जातीने सहभागी होत असत. गावाच्या विकासासाठी त्यांचा कायम पाठपुरावा असायचा. एखादे काम हाती घेतल्यानंतर तडीस नेण्याचा त्यांचा स्वभाव होता. माणसं जोडण्याची त्यांची हातोटी होती. राजकीय क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. मेहकर तालुका रोजगार हमी योजना सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. एक तळमळ असलेला नेता गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजे दरम्यान येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे, अॅड. प्रितम वानखडे, प्रमोद देशमुख, अॅड. शैलेश गायकवाड , ओम सोनोने व मोतीचंद राठोड यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक तसेच जनसागर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे सह बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ठेवण्यात आला आहे.