– तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल!
– तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू!
पुणे/बारामती (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष, तथा खासदार शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, पुढील तपासणीनंतर उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुढील काही तासांत शरद पवार यांची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. परिस्थिती पाहून रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मात्र २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले होते. या दुःखद घटनेनंतर त्यांनी जनतेच्या भेटीगाठी, कुटुंबीयांची भेट तसेच पक्षाच्या कामकाजात स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली.
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर पुणे-मुंबई, मुंबई-पुणे आणि बारामती अशा वारंवार प्रवासामुळे त्यांच्यावर मोठी दगदग झाली. या सततच्या हालचालींचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्याची माहिती आहे. दरम्यान, शरद पवार यांचा त्रास फारसा गंभीर नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीची पुढील माहिती तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.