-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपा येथे तौरल इंडिया प्रकल्पाचे उद्घाटन
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे तौरल इंडिया या अत्याधुनिक औद्योगिक प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन आज विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-महंतांच्या उपस्थितीत पार पडले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंचे सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. परदेशातून आयात होणारे साहित्य आता महाराष्ट्रातच तयार होत आहे आणि भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे ही प्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याने ही बाब अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा विशेष भर असून, पूर्वी मुंबई, एमएमआर आणि पुणेपुरती मर्यादित असलेली औद्योगिक वाढ आता राज्याच्या इतर भागांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सुपा एमआयडीसी हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. दावोस येथे २०२५ मध्ये करण्यात आलेले सामंजस्य करार वेगाने प्रत्यक्षात आणण्यात उद्योग विभाग यशस्वी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्योग उभारणीबरोबरच पर्यावरणपूरक विकास तितकाच आवश्यक असल्याचे सांगत, या प्रकल्पामध्ये सस्टेनेबल कास्टिंग व रिसायकलिंगवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग आणि पर्यावरण हे परस्परपूरक ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हेलिकॉप्टर, जहाजे तसेच रस्ते बांधणीसाठी लागणारे अत्याधुनिक सुटे भाग आता अहिल्यानगरमध्येच तयार होत असल्याने ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम पाचपुते, श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री, श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, तौरल इंडियाचे सीईओ भरत गीते, थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृतीतून दिला एकतेचा संदेश
सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत समाजात दरी वाढत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत असताना, या उद्घाटनाच्या निमित्ताने भगवानगड व नारायणगडाच्या मठाधिपती एकत्र आल्याने समाजात एकतेचा ठोस संदेश कृतीतून देण्यात आला. या ऐतिहासिक उपस्थितीमुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होईल, अशी चर्चा दोन्ही गडांच्या भक्तांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.