-नागरिकांनी एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे): चिखली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच मार्गी लागावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. चिखली तहसीलदार विजय सवडे यांच्या पुढाकाराने हे शिबिर तालुक्यातील विविध मंडळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
हे समाधान शिबिर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी चांधई मंडळातील पळसखेड, उदयनगर मंडळातील उदयनगर, शेळगाव आटोळ मंडळातील देऊळगाव धनगर आणि एकलारा मंडळातील एकलारा येथे होणार आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी अमडापूर मंडळातील इसोली, धोडप मंडळातील डोंगरशेवली, पेठ मंडळातील मंगरूळ नवघरे तसेच हातणी मंडळातील हातणी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलारा मंडळातील कोलारा, मेरा खुर्द मंडळातील मेरा खुर्द आणि चिखली मंडळातील चिखली येथे समाधान शिबिर होणार आहे. अशा एकूण ११ मंडळांमध्ये हे शिबिर राबविले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत शेतकरी व नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये प्रलंबित नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार मंजुरी, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे लँड सिडिंग, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उतारे वाटप, अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करणे यांचा समावेश आहे. तसेच नवीन आधार नोंदणी व आधीचे आधार अद्ययावत करणे, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर, अधिवास, वय, राष्ट्रीयत्व, शेतकरी व भूमिहीन दाखले, ऐपत प्रमाणपत्र आदी विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. मतदान ओळखपत्र वाटप व आधार-मतदान कार्ड जोडणी, संजय गांधी निराधार योजना, विशेष सहाय योजना, रेशन कार्ड संदर्भातील कामकाज, जॉबकार्ड वाटप, आभा कार्ड निर्मिती, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, आरोग्य तपासणी व लसीकरण यांचाही लाभ नागरिकांना मिळणार आहे.
याशिवाय महा डीबीटी पोर्टलवरील कृषीविषयक वैयक्तिक लाभाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजना, ग्रामविकास विभागाच्या योजना तसेच जन्म-मृत्यू नोंद आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रेही या शिबिरात दिली जाणार आहेत. याबाबत माहिती देताना तहसीलदार विजय सवडे म्हणाले की, “प्रशासनाला लोकांच्या दारी नेणे हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना लहानसहान कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज पडू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.” त्यामुळे चिखली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या समाधान शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.