-निलंबित अधिकारी दिनकर सिताराम काळे यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली; ग्रामसभेत सर्वानुमते ठराव स्वीकारला
साखरखेर्डा (वार्ताहर) : शिंदी येथील तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी दिनकर सिताराम काळे यांनी गाव नमुना आठवर खोडताड करून एका इसमाच्या नावे करून त्याला घरकुलाचा लाभ दिला असल्याची तक्रार ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केली. त्यानंतर सदर अधिकारी निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर झाली आहे.
दिनकर सिताराम काळे यांनी पदाचा दुरुपयोग करून अंबादास रामराम वायाळ यांच्या नावे गाव नमुना आठ अ करून मालमत्ता क्रमांक ८६६ मधील जागा नावे केली. अंबादास रामराम वायाळ हे साईनगर, जोगेश्वरी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे राहतात. त्यांना घरकुल मंजूर केले गेले, तर त्याबाबत कोणताही ग्रामपंचायत ठराव किंवा ग्रामसभेचा ठराव न होता हा लाभ दिला गेला. त्याचबरोबर १५ हजाराचा हप्ता शासनाची फसवणूक करून देण्यात आला.
याबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ. साधना अशोक खरात आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सरपंच व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रार सादर केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी बांगर यांनी दिनकर काळे यांना २ जानेवारी रोजी निलंबित केले; परंतु उपरोक्त कारवाई पूर्ण झाली नाही. २६ जानेवारी रोजी घेतलेल्या ग्रामसभेत दिनकर काळे यांच्यावर शासनाची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याअगोदर २३ जानेवारी रोजी मासिक सभेतही ठराव मंजूर करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांना सादर करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.