-राज्यभरातून ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची पेरणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची संदर्भ ग्रंथ मार्गदर्शक पुस्तिकेच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे माजी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब होते. या प्रसंगी संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, वारकरी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विलास बालवडकर, माऊली मंदिराचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तसेच ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे घटक प्रतिनिधी सुरेश वडगावकर, दीपक पाटील, प्रकाश काळे, प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, काळुराम येळवंडे, राम गोरे, संकेत वाघमारे, विश्वम्भर पाटील, राजेंद्र जाधव, कैलास आव्हाळे, प्रल्हाद महाराज भुईभार यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४०० मुला–मुलींनी सहभाग घेतला. राज्यातील शालेय मुलांना ज्ञानेश्वरीच्या अमूल्य विचारांशी जोडण्याचे उल्लेखनीय कार्य यात साधले गेले. सहभागी मुलांनी वक्तृत्व सादर करत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान आणि शाश्वत जीवन मूल्ये आजही कशी सुसंगत आहेत हे मर्म श्रोत्यां समोर मांडले.
स्पर्धेत २३ गुणवंत विजेत्यांना बक्षिसे देत सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे वतीने रोख, वैयक्तिक पारितोषिके आणि प्रमाणपत्र उत्साहात प्रदान करण्यात आले. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी व विलास तात्या महाराज बालवडकर यांनी वैयक्तिक पारितोषिके देत मुलांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या कौशल्यास बळ दिले. या स्पर्धेने आधुनिक स्पर्धेच्या युगातील नव्या पिढीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांची पेरणी झाली असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.