-विद्यार्थ्यांच्या सहभागातून देशभक्तीचा जागर
साखरखेर्डा (अशोक इंगळे): साखरखेर्डा येथे प्रजासत्ताक दिन सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध ठिकाणी झेंडावंदन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण साखरखेर्डा नगरी देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेली होती.
आज सकाळी सात वाजता साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना देत सलामी दिली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, खाजगी शाळा, सर्व बँका, महसूल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी झेंडावंदन पार पडले. जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा (मुले व मुली), जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा, एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज, श्री शिवाजी हायस्कूल, जिजामाता विद्यालय, सहकार विद्या मंदिर, अनिकेत सैनिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.
अनिकेत सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “आपली मुलगी सुरक्षित आहे का?” या सामाजिक विषयावर प्रत्येक चौकात पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आपली कला सादर केली. एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, श्री शिवाजी हायस्कूलमध्ये संस्थाध्यक्ष डॉ. निलम महाजन, एस.ई.एस. हायस्कूलमध्ये सचिव चंद्रशेखर शुक्ल, तर जिजामाता विद्यालयात सचिव पंजाबराव हाडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
महसूल अधिकारी कार्यालयाच्या नियोजित जागेवर महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, भारतीय स्टेट बँक शाखेत शाखाधिकारी सचिन खेडकर, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत शाखाधिकारी शेजूळ, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गोपाल परिहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, संतोष मोरे, ललित अग्रवाल, दिलीप बेंडमाळी, सय्यद रफीक, शेख आयुब कुरेशी, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.