-वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण
बिबी (ऋषी दंदाले): क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी नेते सहदेव लाड यांचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस असून त्यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त किनगाव जट्टू येथील कायंदे हॉस्पिटलसमोर अमृता ब्लड सेंटर, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आले.
मागील आठ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून शासन व प्रशासन दरबारी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे, तसेच माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून एकनिष्ठपणे कार्यरत असलेले सहदेव लाड यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार वर्षांपासून सलग रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील गोरगरीब व गरजू रुग्णांना रक्तपुरवठा व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला असून, यावर्षीदेखील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदात्यांनी रक्तदान करून सहदेव लाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शेतकरी नेते सहदेव लाड म्हणाले की,
“माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे जिवाभावाचे सहकारी हीच माझी खरी ताकद आहे. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मी जे काही उभं करू शकलो, ते या सहकाऱ्यांच्या पाठबळामुळेच. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची लढाई सुरूच ठेवणार आहे.” त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे उपस्थित युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत सहदेव लाड यांनी शेतकरी चळवळीबरोबरच समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.