-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा संदेश
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे): महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे स्वीय सहाय्यक मा. डॉ. मंगेश शिंदे यांच्या हस्ते देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश प्रायमरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ७७ व्या भारतीय सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निता शिंदे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई दीपक घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, जानकीदेवी विद्यालयाचे प्राचार्य हरिदास घुबे, रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल घुबे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील हरीभाऊ जाधव, प्रकाश आबा घुबे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर पाटील घुबे, माजी विद्यार्थी नितेश जाधव, ज्ञानेश्वर साखरे तसेच ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या वतीने डॉ. शिंदे यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी साक्षरतेची शपथ घेतली.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा २०२५ मध्ये यश संपादन करणाऱ्या जानकीदेवी विद्यालयातील रोशनी दुतोंडे, कुणाल आवटे, प्रतीक्षा सुरडकर, गायत्री घायवट तसेच रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील सोहम चेके, गणेश पैठणे, अक्षय डोके या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणेही उत्साहात झाली. विद्यालयाची माजी विद्यार्थिनी साक्षी घुबे, अनुराधा दरेकर, पूजा राऊत, गायत्री घायवट, अश्विनी खेडेकर तसेच इंग्लिश स्कूलचे शिवांश घुबे, युवांश घुबे, काव्या घुबे, श्रेया पवार, विवेक भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी नितेश जाधव यांची एलआयसीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व सातत्याचे महत्त्व पटवून दिले. माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर साखरे यांनी विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी ७७ वेळा टाळ्या वाजवून घेण्याचा उपक्रम राबविला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. मंगेश शिंदे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे, देशाचे सुजाण नागरिक व्हावे. हुशार बनू नका, तर चतुर व्हा. शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवते.” ग्रामीण भागातील जानकीदेवी विद्यालयाने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात शेणफडरावजी घुबे यांनी संस्थेच्या वाटचालीतील अडचणींवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा योग्य वापर करून आपली प्रगती साधावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य हरिदास घुबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इंग्लिश स्कूलच्या शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.