-अखिल भारतीय अधिवेशनात अध्यक्षांचा फिरता चषक मानद पुरस्कार प्रदान
वर्धा (प्रकाश कथले) : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय काँग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी (AICOG) च्या राष्ट्रीय अधिवेशनात सेवाग्राम ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी सोसायटीला २०२४–२०२५ या वर्षासाठी अध्यक्षांचा फिरता चषक मानद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सध्या देशभरात एकूण ४२५ स्त्रीरोगतज्ज्ञ सोसायट्या कार्यरत असून, त्यापैकी कॅटेगरी ‘सी’ अंतर्गत ८७ सोसायट्यांनी नामांकन सादर केले होते. अत्यंत कठीण व स्पर्धात्मक निवड प्रक्रियेतून सेवाग्राम ओबीजीवाय सोसायटीची निवड होऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाल्याने वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाचा गौरव वाढला आहे. हा पुरस्कार सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. पुनम वर्मा व सचिव डॉ. शिल्पा राऊत यांच्या सक्षम, दूरदर्शी नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. मातृ आरोग्य, महिलांचे सर्वांगीण आरोग्य, सुरक्षित मातृत्व, जनजागृती उपक्रम, सामाजिक आरोग्य सेवा तसेच डॉक्टरांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात सोसायटीने सातत्यपूर्ण व प्रभावी योगदान दिले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत दर्जेदार स्त्रीरोग सेवा पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया गायनी कॉन्फरन्समध्ये हा पुरस्कार सोसायटीच्या सचिव डॉ. शिल्पा राऊत व विभाग प्रमुख डॉ. शुची जैन यांना प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानामुळे भविष्यातही महिलांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.