-वृक्षारोपणातून समाजाला मानवता, विवेक व पर्यावरणाचा संदेश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मृत्यूनंतरच्या कर्मकांडात अडकलेल्या रूढी-परंपरांना छेद देत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील भानुसे कुटुंबियांनी समाजाला दिशादर्शक ठरणारा पुरोगामी निर्णय घेतला आहे. येथील माजी सरपंच नारायणराव सखाराम भानुसे यांच्या पत्नी तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक व व्याख्याते डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांच्या मातोश्री चंद्रलेखा नारायणराव भानुसे यांचे १७ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी अत्यंत साध्या पद्धतीने जिजाऊ वंदना सादर करून पार पडला. पारंपरिक १३–१४ दिवस चालणाऱ्या विधींच्या ऐवजी पाचव्या दिवशीच, म्हणजे २१ जानेवारी २०२६ रोजी, रक्षाविसर्जनासह सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी मृतात्म्याच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात येऊन गोडजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परंपरेनुसार अनेक दिवस चालणाऱ्या कर्मकांडांमुळे नातेवाईक, भाऊबंद व आप्तेष्टांना आर्थिक, मानसिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा लग्नकार्ये व इतर सामाजिक कार्यक्रमही स्थगित करावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन मराठा सेवा संघाच्या पुरोगामी विचारधारेचा स्वीकार करत हा निर्णय घेतल्याचे डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले.
या निर्णयास वडील नारायणराव सखाराम भानुसे, बहिण शिवगंगा सुभाष म्हस्के, शिवकन्या दिनेश पडघान, सुशीला अशोक नरवाडे, काका भगवान सखाराम भानुसे, काकू सुनिता भगवान भानुसे यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी एकमताने पाठिंबा दिला. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह आजी-माजी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, “व्यक्ती जिवंत असताना तिची काळजी घेणे, प्रेम व सन्मान देणे हेच खरे कर्तव्य आहे. व्यक्ती गेल्यानंतर कर्मकांडात अडकण्यापेक्षा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी विधी पूर्ण करून त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणासारखी सकारात्मक कृती करणे समाजासाठी अधिक उपयुक्त ठरेल.” या उपक्रमामुळे पंचक्रोशीसह संपूर्ण महाराष्ट्रातून भानुसे कुटुंबियांच्या निर्णयाचे कौतुक होत असून, रूढींपेक्षा विवेक, मानवता व पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचा संदेश समाजात पोहोचत आहे.