– बाबासाहेब नागरगोजेंसह उमेदवारांच्या पदयात्रेला जोरदार जनसमर्थन!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये काल काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने जनतेचा स्पष्ट कौल आणि उत्स्फूर्त पाठिंबा अधोरेखित केला. रस्तोरस्ती उसळलेला उत्साह, नागरिकांची लक्षणीय उपस्थिती आणि घोषणांच्या निनादामुळे संपूर्ण प्रभागात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या पदयात्रेमुळे प्रभाग ८ मधील जनता कोणाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, हे प्रकर्षाने स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब (आप्पा) नागरगोजे यांच्यासह भाजप–राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. आज घड्याळाची टिक-टिक आणि कमळाचा सुगंध अवघ्या प्रभागात दरवळताना दिसून आला. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या पदयात्रेत सौ. भिंगारदिवे सुनिता किसन (प्रभाग ८ अ – घड्याळ), सौ. कातोरे आशाबाई लोभाजी (प्रभाग ८ ब – कमळ) आणि नागरगोजे बाबासाहेब संतोष (प्रभाग ८ क – घड्याळ) यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते, महिला-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभागातील विविध भागांत नागरिकांनी पुष्पवृष्टी, फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त स्वागत करून उमेदवारांचा उत्साह द्विगुणित केला.
माता-भगिनींनी ओवाळणी करून दिलेले आशीर्वाद हे या पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. नागरिकांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा सकारात्मक आढावा घेत, पुढील काळातही विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच, आजच्या पदयात्रेने विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असून, प्रभाग ८ मध्ये विकासाची लाट आणि जनतेची साथ भाजप–राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.