-तक्रारींची दखल; गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत मौजे शिंदी येथील तात्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे यांना आज, दिनांक २ जानेवारी रोजी, गटविकास अधिकारी सिंदखेडराजा वर्ग–१ अजितकुमार बांगर यांनी निलंबित केले आहे.
यासंदर्भात शिंदी येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश तुकाराम खरात यांनी दिनांक ४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये शिंदी येथे कार्यरत असताना गैरवर्तणूक करणे, मनमानी कारभार करून अनियमितता करणे, तसेच ग्रामपंचायतीत आलेल्या महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, असे आरोप नमूद करण्यात आले होते.
याच कारणावरून गावातील एका महिलेने तंटामुक्ती अध्यक्ष व सरपंच पती यांच्यासमोर व्हॉट्सॲप चॅटिंगच्या कारणावरून सवडद ते मोहखेड फाट्यामधील एका कोठ्यावर सदर ग्रामसेवकास चांगलाच चाप दिल्याचीही घटना घडली होती. तरीसुद्धा त्याची वर्तणूक न सुधारल्यामुळे सरपंच यांनी दिनांक २७/१०/२०२४ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तसेच १२ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
यानंतर सदर ग्रामसेवकाची तात्काळ तांदुळवाडी येथे बदली करण्यात आली होती. मात्र, तरीही तो फोनद्वारे तसेच गावात येऊन “माझ्याविरोधात तक्रार कराल तर पाहून घेईन” अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सदर ग्रामसेवकास निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे गावातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात खिळ बसत होता.
या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्या आधारे आज, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी, गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ अन्वये, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे आदेश क्रमांक बुजीप/साप्रवि/आस्था ५/३३३६, दिनांक १/१०/२०२५ तसेच चौकशी अहवाल जाक्र/पंचायत/३३९/२०२५ दिनांक २३/१२/२०२५ च्या आधारे, दिनकर सिताराम काळे (तात्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिंदी, हल्ली कार्यरत ग्रामपंचायत तांदुळवाडी) यांना आदेशाच्या दिनांकापासून ग्रामपंचायत अधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन काळात मुख्यालयाबाबतचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच निलंबन कालावधीत काळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ६८ नुसार कोणतीही नोकरी किंवा उद्योगधंदा करता येणार नाही व तसे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर आदेशात दिनांक १३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
“कुठल्याही प्रकारची अनियमितता तसेच गैरवर्तणूक आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
— अजितकुमार बांगर
गटविकास अधिकारी, सिंदखेडराजा (वर्ग १)
सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात आल्याने सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना एक प्रकारे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात अशा प्रकारचे कृत्य कोणीही करण्यास धजावणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
— गणेश तुकाराम खरात
ग्रामपंचायत सदस्य, शिंदी