– अंढेरा परिसरात शोककळा; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – अंढेरा ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच, सामाजिक कार्यात सक्रिय राहून सर्वांशी आपुलकीने नाते जपणाऱ्या सिंधुबाई सुरेशराव तेजनकर यांचे रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेदरम्यान दुःखद निधन झाले.
स्व. सिंधुबाई तेजनकर या शांत, प्रेमळ व समाजाभिमुख स्वभावाच्या होत्या. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर कार्यरत असताना त्यांनी महिलांचे प्रश्न, गरजू नागरिकांचे प्रश्न आणि ग्रामविकासाशी संबंधित अनेक विषयांवर ठाम भूमिका घेतली. प्रत्येकाच्या अडचणीत मदतीसाठी तत्पर राहणाऱ्या सिंधुबाई सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरल्या होत्या. त्या आदर्शगाव मिसाळवाडीच्या कन्या होत्या. मिसाळवाडीचे माजी पोलिस पाटील स्व. किसनराव पाटील यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अंढेरा, मिसाळवाडीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ११ वाजता अंढेरा येथील त्यांच्या शेतातील पान मळ्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. सिंधुबाई तेजनकर यांच्या जाण्याने तेजनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंढेरा गावाने एक कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व तर मिसाळवाडी गावाने शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्वाला गमावले आहे.