– मुलींच्या रडण्याने उघडकीस आली थरकाप उडवणारी घटना; आईचा मृत्यू, दोन चिमुकल्या रुग्णालयात!
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील वढव येथे घरगुती वादातून एका २५ वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना घडली. संतापाच्या भरात या माऊलीने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून नंतर स्वतःही गळफास घेतला. मात्र नियतीने वेगळाच डाव साधत गळफास तुटला आणि दोन्ही मुली खाली पडल्याने त्यांचे प्राण वाचले, तर आईचा जागीच मृत्यू झाला.
कांचन अमोल सोनुने असे मृत महिलेचे नाव असून, तिने ३ वर्षांची आकांक्षा आणि केवळ ६ महिन्यांची प्रांजल यांना मृत्यूच्या दारात ढकलले होते. घरातील अँगलला तिघींना लटकवल्यानंतर काही वेळातच मुलींच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू आला. आवाजाने सावध झालेल्या गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन दरवाजा तोडला. आत पाहताच अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले. कांचन गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत होती, तर दोन्ही मुली खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यावर फासाचे स्पष्ट वळ दिसून आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घरगुती वादाचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वढव गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे.