-काल टीका, आज प्रवेश; राजकारणात ‘यू-टर्न’चा नवा अध्याय
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अनपेक्षित घडामोडी घडत असतात, मात्र मनसेचे माजी नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या भूमिकेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी सार्वजनिक भाषणात “भाजप हा लबाडांचा पक्ष आहे” अशी जहरी टीका करणारे दिनकर पाटील, पुढच्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करताना दिसले, यामुळे राजकीय विरोधकांसह सामान्य कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिनकर पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते व पक्षाच्या भूमिकांचे उघड समर्थन करत होते. मात्र अचानक त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे मनसे वर्तुळात नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असावा. “राजकारणात कायमचे शत्रू नसतात” या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा या घटनेतून आला आहे, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी पाटील यांच्या प्रवेशाचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल असे म्हटले आहे. मात्र, काही भाजप कार्यकर्त्यांमध्येही या प्रवेशाबाबत कुजबुज सुरू असल्याचे चित्र आहे.