-साखरखेर्ड्यात श्री पलसिद्ध महास्वामी मठात सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांचा ८७ वा जन्मोत्सव
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : आपल्या विचारांवर ठाम राहून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी आयुष्यभर केले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांनी कीर्तनकार, प्रवचनकार व प्रबोधनकार घडवले. त्यांच्या ज्ञानामुळेच आजही समाजात ज्ञानाची गंगा अखंडपणे वाहत आहे, असे प्रतिपादन सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले.
साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ८७ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज १७ डिसेंबर रोजी मठात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष साहेबराव काटे महाराज, संचालक अर्जुन काटे, संचालक राजेंद्र काटे यांच्यासह विविध १२ मठांचे मठाधिपती उपस्थित होते.
सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, पूजा, पाठ, अध्यात्म यापलीकडे जाऊन बाबांचे कार्य होते. आज मी जे काही आहे ते गुरूंच्या कृपेने आहे. त्यांनी मला लहानाचे मोठे केले, ज्ञानाचा प्रसाद दिला आणि उत्तराधिकारी म्हणून निवडले. त्यांच्या ज्ञानप्रकाशामुळे अनेक मठांना योग्य दिशा मिळाली असून सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला दिली आहे.
जन्मोत्सवाच्या निमित्ताने मठात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा एक हजारांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला, तर २५० पेक्षा अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची नांदुरा येथील नेत्रालयात व्यवस्था करण्यात आली आहे.
या वेळी सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.