-सरपंच साधना खरात यांच्या पाठपुराव्याला यश, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाला असून रोजगार हमी योजनेतील वर्ककोडचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शिंदी (ता. सिंदखेड राजा) येथील सरपंच सौ. साधना अशोक खरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न सुटू शकला आहे.
शिंदी गावातील १८ घरकुल लाभार्थ्यांचे रोजगार हमी योजनेचे वर्ककोड एकच असल्याने प्रत्येकी २५ हजार रुपये असे सुमारे साडेचार लाख रुपये बुडण्याची भीती निर्माण झाली होती. या समस्येमुळे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र सरपंच साधना खरात यांनी लाभार्थ्यांना धीर देत गेल्या सव्वा वर्षापासून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.
युवा नेते योगेश जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे हा विषय मांडला. तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा आणि डीआरडीए कार्यालयाकडे लेखी तक्रारीही केल्या. वर्ककोडचा प्रश्न एनआयसी दिल्ली कार्यालयाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्ली स्तरावर पाठपुरावा करण्यात आला.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील ग्रामीण विकास विभाग व एनआयसी कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाला वर्ककोड दुरुस्तीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आता जिल्हा व तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या लॉगिनद्वारे वर्ककोड दुरुस्ती केली जाणार आहे.
या निर्णयाचा फायदा केवळ शिंदी गावापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया न जाता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच सौ. साधना खरात यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.