– देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्याचे रूंदीकरणासह डांबरीकरण, इसरूळ ते बायगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी डॉ. विकास मिसाळ यांनी दिला होता अन्नत्याग आंदोलनाचा इशारा!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव धुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करणे आणि इसरुळ ते बायगाव रस्ता डांबरीकरण करण्याचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा दि.२४ नोव्हेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्यासह इसरूळचे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या इशार्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून, आज (दि.१९)पासून या रस्ताकामाला अखेर सुरूवात झाली आहे. या कामाची पाहणीदेखील डॉ. मिसाळ यांनी करून कंत्राटदाराला सूचना केल्या.
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी डॉ. विकास मिसाळ हे वारंवार आक्रमक भूमिका घेत असून, त्यांच्या आंदोलनामुळेच हा रस्ता प्रश्न मार्गी लागत आला आहे. मागील काही महिन्यांपासून या रस्त्याचे रूंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडलेले होते. ते अखेर सुरू झाल्याने या परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत. देऊळगाव धुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रूंदीकरणासह डांबरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन खूप महिने झाले. काम करण्याची मुदतसुद्धा संपलेली आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत डांबरीकरण तर सोडाच, परंतु रूंदीकरणाचेसुद्धा काम पूर्ण करण्यात आलेले नव्हते. म्हणजेच एकूण कामाच्या १० टक्के कामसुद्धा करण्यात आलेले नाही. हा रस्ता अतिशय खराब झालेला असल्यामुळे वाहनधारकांना तसेच रस्त्यालगतचे शेतकरी आणि रहिवासी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. धुळीमुळे शेतकर्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच, इसरूळ ते बायगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामासंदर्भात दिनांक १७/२/२०२५ रोजी डॉ. विकास मिसाळ यांच्यासह सतिश पाटील, बाळू पाटील या सरपंचांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत देऊळगावराजा उपविभागीय अभियंता यांनी २५/२/२०२५ पासून काम सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. तरीदेखील या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे, डॉ. मिसाळ यांनी देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्ता आणि इसरुळ ते बायगांव रस्ता डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अन्यथा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी खंबीर भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बुलढाणा येथे निवेदन देत, या रस्ताकामाचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू न झाल्यास देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्यावर मिसाळवाडी फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दिनांक २४ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला होता. या निवेदनावर, डॉ. विकास मिसाळ यांच्यासह इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील, शेळगाव आटोळचे उपसरपंच संतोष बोर्डे आदींच्यादेखील सह्या होत्या. या इशार्यानंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने आज अखेर रस्ताकामाला सुरूवात केली आहे. या कामाची पाहणीदेखील डॉ. विकास मिसाळ यांनी करून कंत्राटदाराला सूचना केल्या. रस्ताकाम सुरू झाल्याने परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी डॉ. विकास मिसाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यापूर्वीदेखील शेळगाव आटोळ – इसरूळ- बायगाव रस्त्याची दुरूस्ती करण्यात येऊन, डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देऊनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता केला नाही म्हणून, या रस्त्याच्या डांबरीकरण व दुरूस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, इसरूळचे सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ, शेळगाव आटोळचे उपसरपंच संतोष बोर्डे यांच्यासह परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी शेळगाव आटोळ-इसरूळ रस्त्यावरील मंगरूळ फाट्यावरील संत चोखोबाराय मंदिरासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनास परिसरातील इतरही गावांतील सरपंचांनीदेखील पाठिंबा दर्शविला होता. विशेष म्हणजे, माजी मंत्री तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील कार्यकारी अभियंत्यांना या रस्त्यासाठी आपल्या आमदार निधीतून पैसा देऊनदेखील काम का झाले नाही? म्हणून, जाब विचारला होता. तसेच, रस्ता न झाल्यास डॉ. मिसाळ व सतिश पाटील भुतेकर यांच्यासह परिसरातील गावांतील सरपंचांनी उपोषणास बसण्याचा इशाराही दिला होता. इसरूळवरून तालुकाच्या ठिकाणी शासकीय कामासाठी किंवा व्यक्तीगत कामासाठी नागरिकांना १० ते १२ किलोमीटर हेलपाटे मारून देऊळगावमहीमार्गे चिखलीला जावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एक वर्षापासून रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे पाठ आणि मणक्याचा त्रास्ा होत आहे. आणि संबधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील गावांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.