– लोणार महसूल विभाग व मेहकर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई!
– तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; पुढील दंडात्मक कार्यवाही सुरु!
– सिंदखेडराजा महसूल विभागाच्या आर्थिक देवाणघेवाण अवैध रेती उत्खनन सुरू!
लोणार/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – समृद्धी महामार्गावर मौजे तालुका लोणार येथील बॅरिकेट तोडून चोरमार्गाने रेतीची अवैधरित्या वाहतूक करणार्या तीन टिप्पर वाहनांवर काल, दि. १० जुलै रोजी महसूल विभाग लोणार व पोलिस विभाग मेहकर यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या टिप्परमधून प्रत्येकी २ ब्रास प्रमाणे एकूण ६ ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक होत होती. ही कारवाई तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. महसूल व पोलिस पथकाने योग्य त्या क्षणी ठरल्यानंतर संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, फौजदारी गुन्हा दाखल करून वाहने तहसील कार्यालय लोणार यै अडकवून ठेवण्यात आली आहेत.
या धडक कारवाईत आर. एम. डोळे – निवासी नायब तहसीलदार, मयूर ईप्पर – नायब तहसीलदार, जे. एम. येऊल – मंडळ अधिकारी, पी. आ. डोईफोडे, सुधीर हाणवते, डी. एस. साळवे, मंदार तनपुरे – ग्राम महसूल अधिकारी, भगवान मुसळे – महसूल सहायक यांनी कडक भूमिका घेऊन अवैध रेती वाहतूक रोखण्याची कारवाई केली आहे. महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे चोरमार्गाने रेती वाहतूक करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यासाठी महसूल विभाग सज्ज आहे. सदर रेती ही सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील खडकपूर्णा नदीपात्रातील असल्याने सिंदखेडराजा महसूल मात्र आर्थिक देवाणघेवाण करून अवैध रेती उत्खननाला चालना देत असल्याची परीसरात चर्चा सुरू आहे. याबाबत एमएसआरडीसीचे शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चार दिवसांत समृद्धी महामार्गावरील बॅरिगेटस तोडलेल्या ठिकाणी परत बॅरिगेटस जोडले जाणार असून, परत तोडल्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतांना सांगितले.
याबाबत वारंवार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वृत्त प्रकाशित करूनही एमएसआरडीसीला बॅरिगेटस तोडणार्या रेतीतस्करांवर कारवाई करण्यात वेळ भेटला नाही. तर विश्वासनीय सूत्रांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी एमएसआरडीसी कर्मचार्यांवर दबाव असल्याने ही अद्यापही हे बॅरिगेटस जोडण्यात आले नाही व तोडणार्यावर कारवाई करण्यात आली नाही.