– जिल्हा परिषद, पंचायत समिती ऑक्टोबर, नगरपंचायत, नगरपालिका नोव्हेंबर तर महापालिका डिसेंबरमध्ये?
– राजकीय पक्ष कामाला लागले! भाषा ‘एकी’ची तयारी मात्र ‘बेकी’ची?
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार, येत्या ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती, तर नोव्हेंबर महिन्यात नगरपरिषद व नगरपालिका, तर डिसेंबर महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांनीदेखील तयारी सुरू केली आहे. सदर राजकीय पक्षांकडून भाषा ‘एकी’ची असली तरी तयारी मात्र वेगवेगळे लढण्याची सुरू केल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडल्या आहेत. तेव्हापासून संबंधित संस्थावर प्रशासक राज आहे. पदाधिकारी नसल्याने अधिकारी जुमानत नाहीत, परिणामी जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, अशी ओरडदेखील होत आहे. दरम्यान, २५ मेरोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण लागू करत, चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगासह राज्य शासनदेखील कामाला लागले आहे. राज्यात ३६ जिल्हा परिषद, ३५१ पंचायत समित्या, २२६ नगरपरिषद,१२५ नगरपंचायत तर २९ महानगरपालिका असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने सदर संस्थांच्या निवडणुकीबाबत आदेश दिल्यानंतर प्रशासन या कामात गुंतले आहे. दरम्यान, अपुरे मनुष्यबळ त्यातच मर्यादित असलेल्या इव्हीएम मशीन यामुळे सदर संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात तर महानगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी वापरली जाणार!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व जिल्हाधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत १ जुलै २०२५ पर्यंत मतदारयादीत नावनोंदणी असलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार असून, हीच अद्ययावत मतदारयादी वापरण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी, उपलब्ध मतदान यंत्रांचा अचूक आढावा घेण्यात यावा, आवश्यकतेनुसार पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देशही त्यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. ‘लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक निवडणुकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य निवडणूक आयोग तयारीला लागल्याचे पाहाता, राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे कामदेखील सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेषतः महायुती व महाविकास आघाडीकडून एकत्रित निवडणुका लढण्याची वेळोवेळी भाषा केली जात असली तरी, तयारी मात्र स्वबळाचीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजून स्वबळावर लढल्या जातात. एकंदरीत या निवडणुकांकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून, पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील उत्सुक आहेत. प्रभाग तसेच गट, गणनिहाय आरक्षण कधी निघते, याचीच वाट पाहून आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३४९ पंचायत समित्या आणि इतर मिळून एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख ईव्हीएमची आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणे हे एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा म्हणून, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत विभागण्याची योजना आखली आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदांसाठी मतदान घेतले जाईल, आणि शेवटच्या व सर्वात मोठ्या टप्प्यात, डिसेंबर महिन्यात सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडतील.