– वेळेवर पोहोचत नसल्याने शैक्षणिक नुकसान, देऊळगाव साखरशावरून लाखनवाड्यासाठी ५० विद्यार्थिनी करतात ये-जा!
– युवा स्वाभिमानी पार्टी आक्रमक; नियमित बसफेरीची खामगाव आगारप्रमुखाकडे मागणी!
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील जवळपास ५० विद्यार्थिनी खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे शिक्षण घेतात. परंतु, वेळेवर बस मिळत नसल्याने मिळेल त्या वाहनाने त्यांना शाळा गाठावी लागते. परिणामी, शैक्षणिक नुकसान तर होतेच; पण मानसिक, शारीरिक त्रास होतो तो वेगळाच. तरी सदर विद्यार्थिनींसाठी देऊळगाव साखरशावरून लाखनवाडा जाण्यासाठी सकाळी ९ वाजता व लाखनवाडा येथून सायंकाळी ५ वाजताची नियमित बसफेरी सुरू करावी, यासाठी युवा स्वाभिमानी पार्टी चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत असून, आज, दि. ११ जुलै रोजी स्थानिक आगार प्रमुखांना याबाबत निवेदनसुध्दा दिले आहे.
याबाबत आगारप्रमुख खामगाव यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की देऊळगाव साखरशा येथील जवळपास ५० विद्यार्थिनी खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे इयत्ता नववी, दहावीसह पुढील शिक्षणासाठी ये-जा करतात. परंतु सदर विद्यार्थिनींना नियमित बस नसल्याने त्या मिळेल त्या वाहनाने शाळा गाठतात. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचता येत नसल्याने शैक्षणिक नुकसानदेखील होते. त्यासोबत मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच. तरी सदर विद्यार्थिनींची होणारी गैरसोय टाळण्यासाठी देऊळगाव साखरशा येथून लाखनवाडा जाण्यासाठी सकाळी ९ वाजता व लाखनवाडा येथून सायंकाळी ५ वाजताची नियमित बसफेरी सुरू करावी, व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख राजपाल वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली, युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा मनिषा नालट यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी देऊळगाव साखरशा येथील उर्दू जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिस खान, शेख नसीर , शेख मंजूर, शेख मुख्तार, सय्यद बुढन, शेख बब्बू, शेख अख्तर, यासीन कुरेशी, अकबर कुरेशी आदी पालकांसह युवा स्वाभिमानी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.