-विवाह सोहळ्यात नाव नोंदणी करण्याचे आवाहन; सरकारकडून अनुदानही मिळणार!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून जवळच असलेल्या वडगावमाळी येथे कै. भास्करराव शिंगणे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था यांच्यावतीने दि. १८ मेरोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पालकांनी आपले वर आणि वधु यांच्या नावांची नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाह म्हणजे धावपळ आलीच, अनाठायी खर्च, वेळ, कर्ज काढून, शेती विकून विवाह करणे म्हणजे कर्जबाजारीपणाचे लक्षण आहे. याला फाटा देऊन सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन या अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कै. भास्करराव शिंगणे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेवतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वर, वधु यांचा शाळेचा दाखला, आधारकार्ड झेरॉक्स, जातीचा दाखला, वय अधिवास प्रमाणपत्र, प्रत्येकी दोन पासपोर्ट फोटो, वधुपित्याची बँक पासबुक झेरॉक्स यासह महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव मोबाईल नंबर ७७४१८४१४५८ आणि सचिव दत्तात्रय पोफळे ९६८९९६२६२४ यांनी केले आहे. या विवाह सोहळ्यात एससी, एसटी, व्हीजेएनटीसाठी २० हजार, ओंबीसीसाठी २५ हजार, आंतरजातीय विवाहाला ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पुनर्विवाहासाठीसुद्धा शासनाचे अनुदान राहिल. या विवाह सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद जाधव, माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद माजी सभापती यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.