– तब्बल ३०० ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी; बुलढाण्यातील ट्रॅफिक जाम!
– कर्जमाफी, वीजबिल माफी, पीकविमासह शेतमालाच्या भावावरून शिवसेना नेत्यांचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले, पण कर्जमाफीवरून तोंडाला पाने पुसली. पीकविम्याबाबतही शेतकर्यांची फसवणूक केली. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, वीजबिल माफ करावे, शेतीला संरक्षण म्हणून तार कंपाऊंड द्यावे, शेती मालाला योग्य भाव द्यावा, पीकविमा देण्यात यावा, यासह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने आज (दि.२) बुलढाण्यात विराट असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. तब्बल ३०० ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. बुलढाण्याची ट्रॅफिक जाम झाली होती. शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. शिवसेना नेत्यांनी याप्रसंगी राज्य सरकारवर घणाघाती टीकास्त्र डागले.
निवडणुकीअगोदर महायुती सरकारने शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु निवडणुकीला जवळपास वर्षभर होऊनही शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाही, याचाच जाब विचारण्यासाठी आज बुलढाणा येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता, असे शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगून, राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, आ. सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आदींनी केले होते. जिजामाता प्रेक्षागार येथे शिवसेनेच्या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चात डी एस लहाने, गोपाल बछिरे, सुमित सरदार, संजीवनी वाघ, आशीष रहाटे, सुनील घाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, अशोक गव्हाणे, सुधाकर आघाव, अरुण पोफळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, निंबाजी पांडव, किसन धोंडगे, श्रीराम खेलदार, दीपक चांभारे, ईश्वर पांडव, सिद्धेश्वर आंधळे, गणेश सोनुने यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागातील राष्ट्रमाता जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल येथून दुपारी अडीच वाजता तळपत्या उन्हात या मोर्च्याला सुरूवात झाली. मोर्चात सहभागी होण्यासाठी ३०० ट्रॅक्टर बुलढाणा बाजार समिती परिसरात उभे ठेवण्यात आले होते. तिथून हे शेकडो ट्रॅक्टर शिवसेनेचे झेंडे लावून शिस्तीने मोर्चात सहभागी झाले. मात्र यामुळे संगम चौकसह काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांच्या नियोजनाअभावी वाहतुकीवर परिणाम झाला.
शिवसेनेने ट्रॅक्टर मोर्चा काढून ज्या मागण्या रेटल्या आहेत, त्या मागण्यांबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच आवाज उठवला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनातही तुपकर यांनी या मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले होते. तुपकरांच्याच मागण्या शिवसेना नेत्यांनी या मोर्चात मांडल्या असल्याचे याप्रसंगी दिसून आले.