– नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूमला लागली संशयास्पद आग!
– मेहकर अग्निशमन दलाची गाडी नसल्याने लोणारहून गाडी बोलावली
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूमला आज (दि.३ मे) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संशयास्पद आग लागली. नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी कारवाई जोरात असतानाच, ही आग लागल्याने ती संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. या आगीत जनतेची कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात असले तरी ही नगरपालिका प्रशासनाची अक्षम्य चूक मानली जात आहे. मालमत्तेसंदर्भातील हजारो कागदपत्रे या आगीत जळाली आहेत. लोणार नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलावल्यानंतर ही आग विझवण्यात आली.
सविस्तर असे, की मेहकर नगरपरिषदेच्या कार्यालयाला शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नगरपरिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक झाली आहे. शॉटसर्किटने ही आग लागल्याचे सांगितल्या जात असले तरी आगीचे अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही. तसेच, ही आग संशयास्पद असल्याचा शहरवासीयांचा संशय आहे. आग लागल्याचे लक्षात येताच, स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आणखी भडकत होती. त्यामुळे या घटनेची माहिती पोलिस, अग्निशमन दल आणि नगरपरिषदेच्या अधिकार्यांना देण्यात आली. सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मेहकर नगरपरिषदेचा अग्निशामक बंबदेखील तांत्रिक बिघाड झाल्याने बंद होता. तसेच, तो दुरूस्तीसाठी दुसर्या जिल्ह्यात होता. त्यामुळे लोणार नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. त्याने घटनास्थळी पोहोचून पहाटे पहाटे आगीवर नियंत्रण मिळवले.
मेहकर नगरपरिषद कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे अनेक महत्वाची कागदपत्रे रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भीषण आगीत नगरपरिषदेशी संबंधित अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यापूर्वीदेखील ३१ मार्च २०२२ रोजी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग लागली होती. त्यावेळी सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळालेली होती. आता नगरपरिषद कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळाल्याने ही आग संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. या आगीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.