– पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने जिल्ह्याचा लौकिक वाढला!
चिखली (राजेश लोखंडे) – चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलिस महासंचालक पदक प्राप्त झाल्याने बुलढाणा जिल्ह्याचा लौकिक वाढला आहे. त्यांच्या गौरवास्पद कार्याची दखल घेऊन जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेच्यावतीने ठाणेदार संग्राम पाटील यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रियता प्राप्त केली. कर्तव्यभावनेतून कायदा व सुव्यवस्थेची अमलबजावणी करताना त्यांना सर्वांप्रती समान व्यवहार ठेवला, तसेच गुन्हेगारीचा बिमोड करून लोकांना मोठा दिलासा दिला. बुलढाणा लोकसभा आणि चिखली विधानसभा निवडणुका पार पडत असताना त्यांनी निपक्ष वर्तन ठेवून या निवडणुका शांततेत पार पाडण्याकामी महत्वपूर्ण योगदान दिले. अतिशय संवेदशील परिस्थितीतही त्यांनी एकही तक्रार येवू दिली नाही. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत सलोख्याच्या वातावरणामध्ये साजरी करण्याचे पोलिस प्रशासनाचे कौशल्य दाखवून दिले. तसेच त्यांना नुकतेच पोलिस महासंचालक पदकदेखील मिळाले. त्यामुळे जिल्ह्याच्या लौकिकात वाढ झाली. त्यांच्या पोलिस दलातील या सर्वोत्कृष्ट सेवेनिमित्त जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सम्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार, जिल्हाध्यक्ष विजय जयस्वाल, तालुका अध्यक्ष मंगेश भोलवनकर, कार्याध्यक्ष प्रशांत जैवाळ, कदीर भाई, सिध्देश्वर देव्हरे, हरसिंग छर्रे, राधेश्याम काळे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.