– मेहकरचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पुरूषोत्तम बाहेकर यांच्यासह सिंदखेडराजातील वैभव शेरकर या २२ वर्षीय तरूणाचाही दुर्देवी मृत्यू
चिखली/देऊळगावराजा (एकनाथ माळेकर) – नाव्हा – सिंदखेडराजा रोडवर काल (दि.१४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, या मृतकांवर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर काहींवर आज केले जाणार आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील नाव्हा शिवारात हा अपघात झाला होता. दारूड्या आयशर चालकाने माहूरगडकडे जाणार्या एसटी बसला समोरून ठोकरल्याने दोन प्रवासी जागीच ठार, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर इतर २४ प्रवासी हे जखमी असून, त्यांच्यावर जालना व छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या अपघातात दुर्देवाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वैभव शेरकर (वय २२, सिंदखेडराजा), पुरूषोत्तम बाहेकर ( वय ६०, मेहकर) व विष्णू कांगणे (वय ६२ कुंबेफळ, सिंदखेडराजा, व मोहन राठोड (वय ६५ रा. मेहकर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यापैकी काहींवर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर काहींवर आज सकाळी केले जाणार आहेत. हा अपघात इतका भीषण होता, जखमींना बाहेर काढण्यासाठी पाऊण तास लागला, तर दोन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. जखमीपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. तर एसटीचा वाहक गंभीर जखमी असून, एसटीचालकदेखील जखमी झालेला आहे. जालना पोलिस पुढील तपास करत आहेत.
या दुर्देवी अपघातात मेहकर पंचायत समितीचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पुरूषोत्तम पाटीलबा बाहेकर (वय ६०) रा. मेहकर मूळगाव किन्होळा यांचादेखील दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांच्या पार्थिवावर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम मेहकर येथे आहे.
———-
दारूड्या आयशर ट्रकचालकाने एसटी बसला ठोकारले; चार प्रवासी जागीच ठार, 24 प्रवासी जखमी