– बंदला सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, बंद शांततेत!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिका विटंबनाप्रकरणी साखरखेर्डा येथील आंबेडकर अनुयायांनी शनिवारी रोजी साखरखेर्डा बंदचे आवाहन करीत, उपरोक्त घटनेचा निषेध केला आहे. आणि अशा माथेफिरू व्यक्तिंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
दि. १३ डिसेंबररोजी माजी सरपंच कमलाकर गवई, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी ठाणेदार गजानन करेवाड यांना निवेदन सादर करीत, दि. १४ डिसेंबर रोजी परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी साखरखेर्डा बंद करण्यासंदर्भात निवेदन सादर केले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी साखरखेर्डा बंदला आवाहन केले असता, सर्व नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शांतीचा संदेश दिला असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन समाज बांधवांनी सहकार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वसमाजाला अभिप्रेत असेच आहे. त्यामुळे संविधानाची विटंबना ही कोणालाही मान्य नाही. असे प्रकार घडू नये यासाठी शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी यावेळी केली. आजच्या बंदचे आवाहन माजी सरपंच कमलाकर गवई, सुभाष गवई, भीमराव गवई, दर्शन गवई, दिलीप खंडारे, दिलीप इंगळे, संदीप खिल्लारे, दादाराव गवई, शांताराम गवई, विशाल श्रीराम गवई, पियुष वाघमारे, संजय गवई, आकाश गवई, दीपक जाधव, अशोक गवई, ईश्वर गवई, गजानन गवई, योगेश गवई आदींसह नागरिक सहभागी झाले होते.