१.६२ हेक्टर सरकारी जमीन राखीव ठेवण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गावातील एकमेव सार्वजनिक क्रीडांगणाचे संरक्षण करून ते भावी पिढ्यांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहावे, यासाठी साखरखेर्डा येथील ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गावातील गट क्रमांक ८७० व ८४३ मधील सुमारे १.६२ हेक्टर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवावी, या मुख्य मागणीचे निवेदन २७ जुलै रोजी प्रशासनाला सादर करण्यात आले.
साखरखेर्डा हे परिसरातील मोठे आणि महत्त्वाचे गाव असून येथे विविध क्रीडा स्पर्धा, शालेय क्रीडा सामने, तरुणांचा सराव आणि सामाजिक कार्यक्रम नियमितपणे पार पडतात. या मैदानावर तरुण क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांचा सराव करतात; तर वयोवृद्ध नागरिक प्रभातफेरी (वॉकिंग) व योगासनांसाठी या जागेचा वापर करतात. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि खेळाडूंनी स्वखर्चातून व श्रमदानातून या मैदानाचा विकास केला आहे. त्यामुळे हे मैदान गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
या क्रीडांगणावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा इतर कामांसाठी वापर होऊ नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या जागेची महसूल व क्रीडा विभागाच्या दप्तरी कायमस्वरूपी ‘क्रीडांगण’ म्हणून नोंद करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामसभेत ९५ टक्के नागरिकांचा एकमुखी पाठिंबा
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ जुलै रोजी गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत उपस्थित तब्बल ९५ टक्के ग्रामस्थांनी क्रीडांगणासाठी जमीन राखीव ठेवण्याच्या ठरावाला एकमुखाने पाठिंबा दिला होता.
दिनांक २७ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक रचना जाधव यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. या मागणीला गावातील युवक, क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.