– पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नरहरी झिरवळ, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय सिरसाट, मेघना बोर्डीकर-साकोरे यांना गेले फोन
– तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना अद्याप फोन नाही; पत्ता कटल्यात जमा!
नागपूर (स्वाती ठाकरे) – राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आज (दि.१५) दुपारी चार वाजता नागपुरात होणार असून, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथ घेण्यासाठी येण्याची सूचना केली आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून संबंधित नेत्यांना फोन येण्यास सुरूवात झाली आहे. वृत्तलिहिपर्यंत पंकजा मुंडे-पालवे, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नरहरी झिरवळ, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय सिरसाट, मेघना बोर्डीकर-साकोरे, आदिती तटकरे, प्रताप सरनाईक, शंभुराजे देसाई, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, संजय सिरसाट या नेत्यांना फोन आले असून, इतरांना फोन सुरू होते. तर, शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर व अब्दुल सत्तार यांना अद्याप फोन गेले नसून, त्यांच्या पत्ता कटल्यात जमा आहे. छत्रपती संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनादेखील हे वृत्तलिहिपर्यंत फोन गेला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील संबंधित नेत्यांना फोन करत असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वत: आपल्या काही आमदारांना शनिवारी रात्रीपासूनच फोन करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या पक्षाच्या या पहिल्या पाच जणांमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंचा समावेश नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दोघांवर काही वेगळी जबाबदारी देणार, की त्यांचा पत्ता कट झाला आहे, याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातून संजय कुटे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा असून, खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना फोन गेल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर खामगावला त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर यांच्या रूपाने दुसर्यांदा मंत्रिपद मिळणार आहे.
नागपुरातील राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असून, अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, ज्या नेत्यांना फोन जात आहेत, त्यांच्याकडून यादी स्पष्ट होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या पंकजा मुंडे-पालवेंनाही मंत्रिपदासाठी फोन गेला असून, पंकजा मुंडे या फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये महिला व बालविकास मंत्री होत्या. मध्यंतरी त्यांना मोठा राजकीय संघर्ष करावा लागला होता. फडणवीस मंत्रिमंडळात आता पंकजा यांच्यासह धनजंय मुंडे या बहिण-भावांना संधी मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला मुख्यमंत्र्यांसह २१, शिंदे गटाला उपमुख्यमंत्र्यांसह १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्र्यांसह १० मंत्रिपदे मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह कमाल ४३ मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. आज होणार्या विस्तारात सर्वच जागा न भरता काही मंत्रिपदे रिक्त ठेवली जाणार आहेत. मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून पक्षाच्या आमदारांना सकाळी ९ वाजल्यापासून फोन जाण्यास सुरूवात झाली आहे. नीतेश राणे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर आली. त्याचप्रमाणे गणेश नाईकांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून संपर्क साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मेघना बोर्डीकर-साकोरे यांना फोन आला आहे. मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या माध्यमातून परभणीला मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या फौजिय्या खान यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दहा वर्षांनी परभणीला मंत्रिपद मिळणार आहे. मेघना बोर्डीकर-साकोरे या नागपूरकडे रवाना झाल्या आहेत.
नागपूर विमानतळावर उतरताच शिवेंद्रराजेंना देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राजे शपथ घ्यायला या असे म्हटले आहे. सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १९९८ – १९९९ सालात महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर २६ वर्षांनी सातारा तालुक्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे. वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला असून, त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांना फडणवीस यांनी फोन केला असून, मंत्रिपदासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना फोन आला आहे. नीतेश राणे यांना मंत्रिपदासाठी भाजप कर्यालयातून फोन करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही फडणवीस यांचा फोन आला असून, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, गणेश नाईक यांनाही फोन आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे यांनाही फोन गेल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाकडून उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराजे देसाई, योगश कदम, आशीष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांना फोन गेल्याचीदेखील माहिती हाती आली आहे. शिंदे गटाचे संजय सिरसाट यांना फोन आल्यानंतर ते कुटुंबीयांसह नागपूरकडे रवाना झाले असले तरी, भाजपचे नेते अतुल सावे यांना मात्र अजूनपर्यंत फोन आला नसल्याची माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे. आधी १९९१ साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेस सोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता. त्यानंतर आता दुसर्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे. त्या शपधविधीची मोठी तयारीदेखील करण्यात आली आहे. राजभवनात होणार्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी काल सायंकाळपासूनच सुरू आहे. दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. २० नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ जागांपैकी २३० जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले होते. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला होता.
—————