शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली असता, जे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तणाव दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून लोकांना शांत करत होते, त्यांचीच नावे ठाणेदाराने आकसापोटी आरोपीच्या यादीत घेतली आहेत. तसेच, दररोज नवनवीन नावे गोवली जात असल्याने नागरिक पोलिसांविषयी भयभीत आहेत. या दंगलप्रकरणी प्रत्यक्ष दंगलीशी संबंध नसताना ज्यांची नावे आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आली, त्यांची नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी एका शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शेवगाव येथे घडलेल्या दंगलसदृश घटनेमुळे पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईत व दाखल केलेल्या गुन्ह्यात ज्यांचा या दंगल घडवण्यामधे किंवा प्रत्यक्ष कोणताही सहभाग नव्हता, अशा अनेक नागरिकांचे नावे आरोपी म्हणून आरोपीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काही सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची नावे एफआयआरमध्ये व नंतर रिमांड रिपोर्टमधे घेतली आहेत. त्यामधे विविध संस्थांमधे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ.संजय नांगरे हे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतात, दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी त्यांना मध्यस्थी करण्यासाठी बोलावून घेण्यात आले. आपल्या गावात असा प्रकार होऊ नये म्हणून दंगल होऊ नये म्हणून सोडविण्यासाठी ते गेले होते. तसेच त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाने आकसाने व पक्षपाती भूमिका घेतात म्हणून शेवगावचे पीआय यांच्याविरूद्ध झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता म्हणून त्यांचे आकसाने या गुन्ह्यात नाव गोवण्यात आले आहे.
तसेच दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही लोक काय प्रकार आहे हे बघण्यासाठी व काही सामाजिक, राजकीय कार्यकर्ते दंगल शांत करण्यासाठी दगडफेक करु नये हे सांगण्यासाठी आलेले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरात दिसणारे सर्वांचाच दंगलीत सहभाग होता असे म्हणता येणार नाही.
दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार्यांना जर आरोपी करण्यात आले तर भविष्यात येथून पुढे शहरात असा कोणताही प्रकार घडत असेल तर कुणी ही सोडवायला येणार नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून या प्रकरणी प्रत्यक्ष दंगलीशी सहभागी असणारे सोडून बाकी ज्यांचा या दंगलीशी संबंध नाही अशांची नावे सखोल चौकशी करून सदर दंगलीच्या गुन्ह्यातून वगळण्यात यावीत. दंगल होऊन दोन महिने झाली आहेत, शेवगाव शहरातील वातावरणांत संशयास्पद व पोलीस कारवाईच्या भीतीने ग्रस्त झालेले आहे हे सामाजिक सलोखा यावर परिणाम करणारे आहे. आतापर्यंत अनेक जणांचे आरोपीच्या यादीत नाव आलेले असनाही रोज नवीन नावांचा समावेश पोलिस आरोपीच्या यादीत समावेश करण्यात येत असल्याने जनता भयग्रस्त झाली आहे.
दंगल घडून गेल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसताना रोज आणखी नांव आरोपी च्या यादीत समावेश करण्याचा प्रकार बंद करून नागरिकांना शांततामय जीवन जगण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे मागणीचे निवेदन या शिष्टमंडळाने आज शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे, शेवगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत वेलदे, कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉ. संदिप इथापे, कॉ दत्तात्रय आरे, कॉ गोरक्ष काकडे, बबनराव लबडे आदी उपस्थित होते.