रागा होम परिसर; हजारो नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनास्थेबाबत तीव्र संताप
पिंपरी (महेंद्र हिवाळे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला दरवर्षी करोडो रुपयांचा कर प्रामाणिकपणे भरणाऱ्या चिखलीतील करदात्या नागरिकांच्या नशिबी सध्या चिखल आणि खड्ड्यांचेच साम्राज्य आले आहे. परिसरातील रागा होम जवळील ‘बि. एन. किवळे कोपरा मार्गापासून’ सुरू होऊन घरकुल चौक मार्गे साने चौक ते चिखली रस्त्याला जोडणारा प्रमुख मार्ग सध्या अत्यंत दयनिय आणि बिकट अवस्थेत पोहोचला आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून प्रवास करताना “समोर गाडी, खाली खड्डा अन् वरून चिखल” अशी जीवघेणी कसरत नागरिकांना करावी लागत असून, एखादा मोठा अपघात घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल या भागातील रहिवासी उपस्थित करत आहेत.
या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ३ ते ४ नामांकित शाळा आणि हजारो गृहनिर्माण संस्थांचा (सोसायट्यांचा) परिसर आहे. रोज सकाळी शेकडो शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार याच मार्गाने ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले ‘हात-हात’ खोल खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे साचलेले चिखलाचे तळे यामुळे पादचाऱ्यांना चिखलातूनच कसरत करत वाट काढावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनचालक सर्रास ‘विरुद्ध दिशेने’ (रॉंग साईडने) वाहने चालवत असल्याने समोरासमोर अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच शेजारून जाणारी वाहने अंगावर चिखलाचे फवारे उडवत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाला थेट प्रश्न :
- सुरक्षेचा बळी कधीपर्यंत? — दररोज याच मार्गाने प्रवास करणाऱ्या शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असताना पालिका प्रशासन कधी जागे होणार?
- दुरुस्तीचा मुहूर्त कधी? — नेहमीप्रमाणे पावसाळा पूर्ण संपल्यानंतरच कागदी घोडे नाचवत दुरुस्तीची कामे काढली जाणार का?
- पोकळ आश्वासनेच की प्रत्यक्ष काम? — कर वसूल करताना तत्पर असणारी पालिका रस्ता दुरुस्तीच्या वेळी फक्त आश्वासनांची खैरात वाटणार की प्रत्यक्षात काम करणार?
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
“आम्ही दरवर्षी वेळेवर कर भरतो, मग मूलभूत सुविधांसाठी आम्हाला चिखलात का उभे राहावे लागत आहे? प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे नागरिक एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील.”
— स्थानिक रहिवासी, चिखली परिसर