-दिव्यांग वारकऱ्याच्या रूपातून भक्ती, श्रद्धा आणि पावसासाठीची प्रार्थना चित्रबद्ध; कलाकृतीचे सर्वत्र कौतुक
मुक्ताईनगर (अर्जुन मेदानकर) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील श्री एस. बी. चौधरी हायस्कूलचे कलाशिक्षक तथा चित्रकार राजू साळी यांनी आपल्या कुंचल्यातून विठुरायाचे आकर्षक आणि भावस्पर्शी चित्र साकारले आहे. या चित्रातून भक्ती, श्रद्धा, वारकरी परंपरा आणि निसर्गाविषयीची संवेदनशीलता यांचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साकारलेल्या चित्रामध्ये सायकलवरून पंढरपूरच्या दिशेने निघालेला एक दिव्यांग वारकरी दाखविण्यात आला आहे. त्याच्या डोक्यावर साक्षात विठुरायाची पाषाणमूर्ती विराजमान असल्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या कलाकृतीतून अखंड श्रद्धा, भक्ती आणि वारकरी संप्रदायातील समर्पणाची भावना जिवंत करण्यात आली आहे. चित्राच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावेत आणि जनजीवन समृद्ध व्हावे, अशी प्रार्थनाही राजू साळी यांनी व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीच्या आध्यात्मिक वातावरणाला साजेशी ही कलाकृती भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर राजू साळी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना, “आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल हरिनामाच्या प्रकाशाने उजळून निघो, मन भक्तीने समृद्ध होवो, प्रत्येक संकटावर श्रद्धा आणि संयमाचा विजय मिळो, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीची अखंड कृपाछाया आपल्या जीवनावर राहो,” असा संदेश दिला. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने साकारलेल्या या चित्रातून भक्ती, सामाजिक संवेदनशीलता आणि पर्यावरणाबद्दलचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आल्याने या कलाकृतीचे भाविकांसह कला रसिकांकडूनही विशेष स्वागत होत आहे.