-संत ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थळी पुष्पवृष्टी; सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : भारतीय संस्कृती संरक्षण संस्थानचे कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या पुढाकाराने कारगिल विजय दिनानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीस्थळी भारतीय सैनिकांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून वीर जवानांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. यानिमित्त आयोजित पुण्यवचने व कीर्तन सोहळा भक्तिमय आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
ह.भ.प. दिगंबर महाराज नरवडे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अद्वितीय शौर्याची गाथा उलगडली. त्यांनी सांगितले की, १९९९ मधील कारगिल युद्धात भारतीय जवानांनी सुमारे २० हजार फूट उंचीवरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा पराभव करून जगासमोर भारतीय सैन्याचे सामर्थ्य सिद्ध केले. रात्रीच्या अंधाराचा आणि गनिमी काव्याचा प्रभावी वापर करत भारतीय जवानांनी विजय मिळविला. या युद्धात ५२७ जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर अनेक सैनिक कायमचे जखमी झाले. त्यांच्या त्यागाचा इतिहास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या “रात्रंदिवस आम्हा नामाचे हत्यार…” या अभंगाचा संदर्भ देत भारतीय सैनिकांच्या राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यात आला. “आज आपण सुरक्षित आणि सुखी आहोत, कारण देशाच्या सीमांवर भारतीय सैनिक अहोरात्र सज्ज आहेत,” असा भावनिक संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात नायक सुभेदार घणेश्वर भोस, सुभेदार गणेश दामोदर, नायक नरेंद्र वाघमारे, नायक संदीप इंदलकर, कॅप्टन बाळासाहेब आढाव आणि नायक सुभेदार दत्तात्रय पोतदार यांच्यासह कारगिलमधील वीर जवानांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. नारायण महाराज जाधव, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, अर्जुन मेदनकर, दशरथ महाराज चवरे, ह.भ.प. निवृत्ती महाराज ताठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान राष्ट्रपती भवनात आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रदर्शित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
संसदेत पसायदान प्रदर्शित करण्याची मागणी
भारतीय संस्कृती संरक्षण संस्थानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वशांती, समता आणि मानवकल्याणासाठी रचलेले पसायदान संसदेच्या दोन्ही सभागृहात लावण्यात यावे, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी दिली. यासंदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच खासदार आणि आमदारांना निवेदने देण्यात आली असून, संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठीही सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कारगिल युद्धातील सर्व वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय जवान, जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमास भाविक, वारकरी, नागरिक आणि देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.