कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव हे कार्यालयात न येता घरूनच कारभार करत असल्याची तक्रार विठ्ठल सोनमाळी यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी मुख्याधिकारी यांना नोटीस काढली असून, तीन दिवसात खुलासा करण्याबाबत कळविले आहे.
कर्जत येथील विठ्ठल सोनमाळी व इतर काही व्यक्तीनी कर्जत नगर पंचायतीमधील विविध विषयाबाबत तक्रारी केलेल्या असून, याचे उत्तर त्यांना मिळत नसल्याचे सांगत, कर्जत नगरपंचायत येथे अर्जाचे उत्तर मागण्यासाठी अनेक वेळा जात येत असून, कर्जत नगरपंचायचे मुख्याधिकारी गोविंद जाधव कित्येक महिन्यापासुन आजतागायत कार्यालयात आलेले नाहीत. तसेच संपर्क साधण्यासाठी फोन केला असता ते फोनचे उत्तर देत नाहीत, असे म्हणत विठ्ठल सोनमाळी यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मी सामन्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून अर्ज करतो आहे, मुख्याधिकारी गोविंद जाधव हे गेल्या कित्येक महिन्यापासून कार्यालयाची पायरी चढलेले नाहीत. माझ्याबरोबर अनेकांची कामे रखडलेली आहेत. त्यांचा आर्थिक फायदा असणार्या बिलांची कामे ते आपल्या राहत्या घरी कर्मचारी यांना बोलवून करत आहेत, असे दिसून येत आहे. असा आरोप करताना जर ते कार्यालयात येत नसतील तर कर्जत नगरपंचायत कार्यालयाचा पत्ता त्याचे घर असेल तर तसे जाहीर करण्यात यावे, असे आवाहन वरिष्ठांना पाठवलेल्या अर्जात केले आहे. मुख्याधिकारी कित्येक महिन्यापासून कार्यालयात येत नसतील तर त्यांचे पगार कोणत्या आधारावर ते स्व:ता काढतात, याचा खुलासा व्हावा, व ते कार्यालयात येतात की नाही, या पुराव्यादाखल कार्यालयाचे ऑडिओची सुविधा असणारे सीसीटीव्हीही तपासावेत, अशी मागणी केली आहे. कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याविरुद्ध विठ्ठल सोनमाळी यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नपप्रचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी मुख्याधिकारी यांना नोटीस काढली असून तीन दिवसात खुलासा करण्याबाबत कळविले आहे. सदर नोटीस प्राप्त होताच मुख्याधिकारी कार्यालयात हजर झाले असल्याचे सोनमाळी यांनी म्हटले आहे.
याबाबत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेकडे माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेले असता ते प्रशिक्षणासाठी औरंगाबादला गेले असल्याचे कार्यालयीन प्रमुख रवींद्र साठे यांनी सांगितले. मुख्याधिकारी जाधव हे कार्यालयात येत होते का? असे विचारले असता ते संपूर्ण कामकाज पाहत होते, असे उत्तर देऊन अधिक माहिती आपण त्यांनाच विचारावे असे म्हटले.
————