रावसाहेब दानवे, आयोजक हात जोडत राहिले, लोकं निघून गेले!
– सिल्लोड येथील जाहीर सभा रद्दचे कारण आले चव्हाट्यावर!
सिल्लोड (तालुका प्रतिनिधी) – येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भागवत कराड यांच्याहस्ते उद््घाटन झाले. परंतु, यानंतर आयोजित जाहीरसभेकडे पाठ फिरवत मुख्यमंत्री शिंदे हे इगतपुरीकडे निघून गेले होते. रद्द झालेल्या या सभेचे वास्तव ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाने चव्हाट्यावर आणले असून, लोकं भर सभेतून उठून गेल्याने ही सभा रद्द करावी लागल्याचे उघडकीस आले आहे. आयोजक आणि स्वतः रावसाहेब दानवे हे लोकांना सभेसाठी बसून रहा म्हणून हात जोडत होते. परंतु, लोकं उठून गेल्याने काही मिनिटांत सभास्थळ खाली झाले होते. या सभेचा पचका टाळण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे हे जाहीर सभा न घेता निघून गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला लागलेल्या भीषण आगीची पाहणी व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी आपण तातडीने सिल्लोडमधून निघून आल्याचे मुख्यमंत्री शिंदे सांगत असले तरी, त्यांच्या जाहीर सभेला लोकंच थांबले नाहीत, हे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे हे कृषीप्रदर्शन पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरले आहे. या प्रदर्शनासाठी कृषीविभाग वेठीस धरण्याचा व पैसे गोळा करण्याचा आरोप झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंसह इतर मान्यवर नेते आले, त्यांनी प्रदर्शनीचे उद््घाटन केले व तातडीने निघून गेले. जाहीरसभा लोकांअभावी रद्द करावी लागली. तसेच, या कार्यक्रमाकडे शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाठ यांनीदेखील पाठ फिरवली होती. त्यानिमित्ताने शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावरदेखील आली होती.
————–