पुणे (विशेष प्रतिनिधी) – मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर तब्बल पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली होती. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. मात्र, आज सकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज दुपारी २.३० वाजता विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९७१ सालापासून त्यांनी या क्षेत्रात करिअर केले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘परवाना’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर त्यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. भिंगरी, कळत न कळत, माहेरची साडी, दे दणादण, नटसम्राट अशा मराठी चित्रपटातील अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.
————–