चिखली/औरंगाबाद (एकनाथ माळेकर) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे औरंगाबादेत दाखल झाले असून, तेथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर ते जालनामार्गे देऊळगावराजाकडे रवाना झाले आहेत. तेथे हॉटेल गोकुळ येथे थोडा वेळ थांबून चिखलीकडे रवाना होणार असून, सभेपूर्वी ते हॉटेल स्वरांजी येथे थांबणार आहे. दरम्यान, सर्वात मोठी व महत्वाची बातमी म्हणजे, सभेनंतर ठाकरे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची भेट घेणार आहेत. खेडेकर यांच्या निवासस्थानी ठाकरे हे जाणार असून, या भेटीत ठाकरे यांना मराठा सेवा संघाकडून १२ जानेवारीरोजाच्या सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्मोत्सवाचे निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार हे मराठा सेवा संघाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे भाजप व संघाच्या विचारसरणीकडून शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांचे राजकीय अस्तित्व उद््ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु असताना, मराठा सेवा संघासह सर्व पुरोगामी संघटना व पुरोगामी ताकद उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे एकवटलेली आहे. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आदेशावरून संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केली असून, संभाजी ब्रिगेडची आक्रमक ताकद ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली आहे. त्यामुळे, आज सकाळी मुंबईतून निघालेले उद्धव ठाकरे हे दुपारी उशिरापर्यंत चिखलीत पोहोचत असून, तालुका क्रीडा संकुलातील विराट जाहीर सभा संपल्यानंतर, ते शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहे. शिवसेनेची जाहीरसभा व शेतकरी मेळावा हा दुपारी तीन वाजता आयोजित केला असला तरी, उद्धव ठाकरे यांची सभा साडेपाच ते सहा वाजेदरम्यान सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक तर सभेपूर्वी किंवा सभेनंतर ठाकरे हे खेडेकर यांची भेट घेतली, असे ठाकरेंच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले.

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह ते शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यादेखील घरीदेखील जाणार आहेत. शिवसेनेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देऊळगावराजा येथे हॉटेल गोकुळ येथे थोडावेळ आराम व दुपारचे जेवण घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे चिखलीकडे रवाना होणार असून, चिखलीतील हॉटेल स्वरांजली येथे ते थांबतील. हॉटेलवरून ते सभास्थळी पोहोचतील. सभा संपल्यानंतर ते प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या घरी व नंतर शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या घरी जाणार आहेत. १२ जानेवारीरोजी मराठा सेवा संघासह संघाच्या इतर संघटनांकडून जिजाऊ जन्मोत्सवाचे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी यावेळेस उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार असून, त्याचे निमंत्रण ठाकरे यांना या भेटीत शिवश्री खेडेकर हे देतील, अशी शक्यता आहे.
आता काय बोलायचं ते चिखलीत बोलू – संजय राऊत
दरम्यान, चिखली येथील सभेबाबत बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात जे काही चाललं आहे, त्यावरून संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे? पण आज इथे बोलण्यापेक्षा आम्ही चिखलीतील सभेत बोलू, ही सभा ऐतिहासिक होईल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर पुरुष ज्या मातीने आम्हाला दिला, ती राष्ट्रमाता जिजाऊ, यांच्या भूमीमध्ये आजची सभा आहे. त्या भूमीमध्ये फक्त निष्ठा आणि इमान याचेचं बीज रोवलं गेल आहे. तिथे बेईमानांना अजिबात थारा देणार नाहीत. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल अशा राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमीत विराट सभा होत आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे.
——————