लोणार पर्यटनस्थळी पुरातन विभागाच्या कर्मचार्याची ‘गुंडगिरी’, धारेखाली अंघोळ केली म्हणून वृद्धास बेदम मारहाण!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – गेल्या दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी येथील संत सखाराम महाराज यांची यात्रा सुरू आहे. या निमित्ताने मराठवाड्यातील लाखो भाविक मोठ्या प्रमाणात लोणारवरून लोणीकडे जात असतात. यावेळी लोणी येथे जात असताना नेहमीप्रमाणे भाविक लोणार धारतीर्थ येथे भेट देऊन पुढे यात्रेकसाठी रवाना होत असतानाच, मराठवाड्यातील अशाच एका वयोवृध्दास लोणार धारतीर्थ येथे असलेल्या पुरातन विभागाच्या कर्मचार्याने धारेखाली आघोळ केली, या कारणावरून बेदम मारहाण केली. या घटनेचा तीव्र निषेध गावकर्याकडून होत असून, दोषी असलेल्या पुरातन विभागाच्या कर्मचार्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
मराठवाड्यातील वयोवृध्द हे आपल्या कुंटुबासह लोणी येथे यात्रेला जात असताना, लोणार येथे असलेल्या धारतीर्थ येथे स्नान करून पुढे जावे, या उद्देशाने या वयोवृध्द यात्रेकरूने नेहमीप्रमाणे धारेखाली आघोळ केली. या प्रकाराचा राग पुरातन विभागाच्या कर्मचार्यास आला व या कर्मचार्याने अक्षरशः कायदा हातात घेऊन सदर वृद्धास समजावून न सांगता मारहाण सुरू केली. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या यात्रेकरूने मध्यस्थी करून हा वाद मिटवला. परंतु, धारेवर आंघोळ करणे बंद असल्याची कोणतीही बाब संबंधित पुरातन विभागाच्या कर्मचारी यांना न सांगता मारहाण करणे योग्य आहे का? कर्मचारी यांना मारण्याचा अधिकार पुरातन विभागाने दिलेला आहे काय, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. बाहेरगावावरून आलेल्या पर्यटकाना जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर पर्यटक यापुढे येणार नाही, या घटनेची माहिती लोणार शहरात पसरताच सर्वत्र पुरातन विभागाच्या या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त आहे. संबंधित कर्मचारी याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह सर्वस्तरातून होत आहे.
——————–