शिवशक्तीपीठ रूईखेड मायंबा येथे १५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!
– १४ ट्रॅक्टरने २१ क्विंटल गव्हाची पोळी, १४ क्विंटल काशीफळाच्या भाजीच्या महाप्रसादाचे वाटप!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – निष्काम कर्मयोगी संत तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांचा ८० वा जन्मोत्सव सोहळा त्यांच्या मूळ जन्मगावी अर्थात शिवशक्तीपीठ रूईखेड मायंबा येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा तब्बल १५ हजारपेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतला. यानिमित्त शुकदास महाराज यांच्या निघालेल्या शोभायात्रेत २० गावांच्या दिंड्यांचा सहभाग होता. अतिशय अवर्णनीय असा सोहळा पार पडला.
कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त’ त्यांच्या जन्मगावी शिवशक्तीपीठ रुईखेड (मायंबा) येथे भव्य यात्रा महोत्सव व महाप्रसाद सोहळा अतिशय आनंदात पार पडला. या सोहळ्यामध्ये जवळपास १५ हजार भाविक भक्तांनी ‘महाप्रसाद’ सोहळ्याचा लाभ घेतला. शोभा यात्रेमध्ये २० गावांच्या दिंड्यानी सहभाग नोंदवला, ५०० भाविकांनी आरोग्य निदान शिबिराचा लाभ घेतला. सकाळी सात वाजेपासून रथयात्रा सोहळ्याला हिवरा आश्रम येथून सुरुवात झाली. रुईखेड (मायंबा) येथे ही रथयात्रा दुपारी साडेतीन वाजता पोहोचल्यानंतर रुईखेड (मायंबा) गावातून जय विवेकानंद, जय शुकदास माऊली हा जयघोष करत शिवशक्तीपीठ येथे ठीक पाच वाजता रथयात्रा पोहोचली. तेथे पू. शुकदास महाराजश्रींची आरती करून जयघोष करण्यात आला.
तब्बल १४ ट्रॅक्टर व १५० वाढेकरी स्वयंसेवक यांच्यावतीने २१ क्विंटल गव्हाची पोळी व १४ क्विंटल कशिफळाची भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर ठीक सात वाजता विवेकानंद आश्रमाचे गायकवृंद यांचे भक्तीगीत गायन रंगले. तसेच रात्री आठ वाजता ह.भ.प.गजाननदादा पवार शास्त्री महाराज यांचे प्रवचन झाले. आपल्या सुमधुर प्रवचनातून त्यांनी शुकदास महाराजश्रींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत. जीवाला मुक्तीचा बोध हवा असेल तर महाराजांच्या विचारांना समजून घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. आपण सद्या त्रस्त आहोत, कारण आपण नानाविध कामांत व्यस्त आहोत. स्वतःच्या आत शिरून शांततेचा लाभ घेतला तर ईश्वराचे सानिध्य लाभले, असे वाटेल, असेही हभप. गजाननदादा शास्त्री यांनी याप्रसंगी सांगितले. रात्री ०९ ते ११ वाजता ह.भ.प.महंत समाधान महाराज भोजेकर जळगाव खान्देश यांचे हरिकीर्तन होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो महिला व पुरुष भक्तांची उपस्थिती होती.
————–