मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज दोन मिनीटात माफ; पण शेतक-यांना मात्र कर्जमाफी नाही : राहुल गांधी
जनतेत भिती, दहशत पसरवण्याचे केंद्रतील मोदी सरकारचे काम!
हिंगाेली (जिल्हा प्रतिनिधी) – केद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा , भीती पसरवत असून त्याच्या विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजपा व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरूवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते पण नुकसाई भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटात माफ करतात पण शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खा. राहुल गांधी यांनी केला.
हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथे आजच्या पदयात्रेची चौक सभेत हजारो लोकांना संबोधित करताना राहुल यांनी भाजपा, आरएसएस, मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, भाजपाच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान झाले, हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार ‘हम दो हमारे दो’ चे आहे असे राहुलजी गांधी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, ‘दो सरकार में, दो बाजार में’, असा आवाज उमटला. चीनमधून वस्तू आयात केल्या जातात यातून चीनचा फायदा होतो आणि हे माल विकणारे काही उद्योगपती गडगंज होत आहेत. हे माेबाईल व इतर वस्तू ‘मेड इन चीन, नाही तर मेड इन हिंगोली’ अशा झाल्या पाहिजेत. मोदी सरकार हिंसा, धर्म, जात यामध्ये जनतेला गुंतवून ठेवत आहे, मुख्य मुद्द्यांची चर्चाच होऊ दिली जात नाही. शिक्षण, आरोग्य सर्व काही खाजगी केले, सामान्य जनतेला हे परवडणारे नाही. तुम्ही शिक्षण, आरोग्यासाठी आवाज उठवला पाहिजे. गरिबांना मोदींच्या राज्यात स्थान राहिलेले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, बँक, शिक्षण, हाॅस्पिटल सर्व काही खाजगी उद्योगपतींच्या खिशात घातले आहे.
लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, मधले तरुण देशासाठी मरण्यास तयार असतात पण येथेही मोदींनी अग्निपथ योजना आणली. जवानांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे पण मोदी सरकार फक्त सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत आहे, हे जवान आव्हानाला कसे सामोरे जाणार ? जवानांना सेवेनंतर गावात सन्मान मिळत होता. 15-20 वर्ष देशासाठी दिल्यामुळे हा सन्मान मिळत असे पण अग्निपथमुळे सैन्यच कमजोर होईल. आता त्यांना या सेवेतही स्थैर्य नाही, चार वर्षानंतर घरी जा, अशी ही योजना आहे, यातून बेरोजगारी वाढवण्याचे काम होणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात आठव्या दिवशी जनतेचा उदंड प्रतिसाद
डॉ. विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली १२ हजार सांगलीकरांचा पदयात्रेत सहभाग
राहुल गांधींच्या भव्य आकाराच्या रांगोळीने भारतयात्रींचे अनोखे स्वागत
हिंगोली – भारत जोडो यात्रेचे ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून प्रवेश केल्यानंतर मागील सहा दिवस गावा- गावातून या पदयात्रेला प्रतिसाद वाढत आहे. रविवारच्या विश्रांतीनंतर कळमनुरीतील वस्पनगारा फाटा येथून सकाळी जोश व उत्साहात निघाली. सांगली जिल्ह्यातुन आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने सोमवारी सकाळी भारत जोडो यात्रा निघाली. यात्रेचे बोधचिन्ह मुद्रीत केलेले सफेद टीशर्ट आणि सफेद टोपी घातलेल्या १२ हजार सांगलीकरांच्या उत्स्फूर्त गर्दीने रस्ता फुलून गेला होता. माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव परिसरातील या कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी केले होते. महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर देगलूरपासून सांगलीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात्रेत आहेत. आज त्यात पुन्हा भर पडली, त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर देशांच्या उभारणीतील पंडीत नेहरूंचे योगदान दर्शविणारे फोटो प्रदर्शन काही ठिकाणी भरली होती. नेहरूंची सातत्याने बदनामी भाजपकडून करण्यात येते, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू कुटुंबियांचे देशासाठी योगदान त्यातून दाखवले असल्याचे आयोजकांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी भव्यदिव्य रांगोळीत त्यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. त्यासाठी राहुल स्वामी या कलावंताने 48 तास मेहनत केल्याचे सांगितले. इतर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठया रांगोळ्या काढल्या होत्या. कुठे रस्त्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण होती. तर कुठे लहान मुले गुलाबाची फुले आणि तिरंगी झेंडे हातात घेऊन स्वागतासाठी उभी होती, अशा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात बालदिनी भारतयात्रींचे जंगी स्वागत हिंगोलीमध्ये झाले. पंडित नेहरू यांची प्रतिमा पुजन करून जागोजागी आदरांजली वाहण्यात आली होती. सत्र न्यायालय परिसरात तीन वर्षाची प्रदक्षिणा राहुलजींच्या स्वागतासाठी आपल्या सवंगड्यासह उभी होती. तर सर्वधर्म समभावचा संदेश देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई धर्माच्या वेशभूषा लहान मुलांनी परिधान केल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात गावोगावी फिरुन शत्रूची माहिती आमच्या कलांच्या माध्यमातून जमा करून राजापर्यंत पोहोचत होतो. पण आता आम्हाला भिक्षा मागून जगावे लागत आहे. आम्हाला राहायला घरे, दारे, शेती, पेंशन मिळावी, या मागणीसाठी वासुदेव आणि गोंधळी पारंपरिक वेशभूषेत राहुजींना भेटण्यासाठी आले होते. जुनी पेन्शन पूर्ववत लागू झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. तर पुण्यातून आलेल्या डॉक्टर दिलीप लांडे यांनी दोन क्विंटल फुले रस्त्यावर अंथरली होती. राहुल गांधी समाज जोडण्याचे काम करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त गुलाबांच्या फुलांनी यात्रेकरूंचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले.