पुणे (विशेष प्रतिनिधी) – बचत गटाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर महिलेचा व्हाटसअप नंबर घेऊन तिच्याशी अश्लील चॅटिंग करणे, तिला लॉज बोलावणे एका ३० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले असून, या महिलेने त्याला गोड बोलून बोलावून घेत, त्याचे अपहरण केले, त्यानंतर त्याला कात्रज बोगद्याकडे आडवळणाला नेत, तीन मित्रांच्या सहाय्याने त्याचे लिंगच सोलून काढले. त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर तो मृत्युमुखी पडला असे समजून, तेथून पळ काढला. याप्रकरणी या पीडित तरुणाच्या तक्रारीवरून संबंधित महिलेसह तीन जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिला ही कुख्यात गुंड नीलेश वाडकर याची विधवा पत्नी आहे.
सविस्तर असे, की कुख्यात गुंड नीलेश वाडकर याचा काही वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी पूनम वाडकर ही बचत गटामध्ये काम करत असे. यावेळी फिर्यादी विनायक लोंढे याची कर्ज देण्याच्या बहाण्याने पूनम समवेत ओळख झाली होती. या ओळखी नंतर पूनमला फिर्यादी लोंढे व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज करत होता. तसेच, सतत तिची छेड काढत होता. पोलिसांनी नोंदविलेल्या घटनाक्रमानुसार, दिनांक १२/११/२०२२ रोजी आरोपी पूनम नीलेश वाडकर हिने तक्रारदार तरुणाशी व्हाटसअपवर चॅटिंग करुन त्याला स्वामी नारायण मंदिर, आंबेगाव खुर्द, पुणे येथील चौपाटीवरील हॉटेलसमोर भेटण्यासाठी बोलावले होते.
विनायक लोंढे हा त्याठिकाणी आल्यानंतर पूनम ही तिच्या इतर तीन साथीदारांसह तेथे आली. त्या तीन साथीदारांनी लोंढेला मारहाण करुन डोक्यात दगड मारुन जखमी केले. एवढेच नाही, तर धारदार हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याला मुंबई-बेंगळुरू हायवेने नवीन कात्रज बोगद्यातून शिंदेवाडी येथून कात्रज जुना बोगदा खेड शिवापूरच्या बाजूच्या रोडपासून थोडे पाठीमागे असलेल्या रस्त्याने आडबाजूला नेले. ‘तू पूनमला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे? असे म्हणून ‘थांब तुझे लिंगच कापतो’ असे म्हणत आरोपी पूनम वाडकर आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी लोंढेला खाली पाडून पकडून ठेवले. तर दुसर्या इसमाने त्याच्या जवळील धारदार हत्याराने लोंढेच्या लिंगावरील कातडी सोलून काढली. नंतर तेच हत्यार लोंढेच्या डोक्यात मारत तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. एवढेच नाही, तर पोलिसांकडे तक्रार केल्यास खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली.
विनायक लोंढे हा अर्धवट बेशुद्ध पडल्यानंतर, तो मृत झाला असे समजून, आरोपीसह पूनम वाडकर ही तेथून पळून गेली. शुद्धीवर आल्यानंतर लोंढे हा हायवेवर आला. त्याने पोलिसांना फोन करत मदत मागितली. काही नागरिकांनी त्याला मदत देत, पोलिसांच्या सहाय्याने रुग्णालयात नेण्यात आल्याने, त्याचा जीव वाचला, अन्यथा अतिरक्तस्त्राव होऊन तो मृत्युमुखी पडणार होता. या बाबत विनायक लोंढे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपी पूनम नीलेश वाडकर आणि तिच्या इतर तीन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. कर्चे हे करीत आहेत.
————-